नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून, त्यांची ट्विटरवरील लोकप्रियता खूपच कमी झाली आहे. एकाच दिवशी तब्बल तीन लाखांहून अधिक युजर्सनी मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केलं. पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय पचनी न पडल्याचेच हे लक्षण मानले जात आहे. ट्रॅकालिटिक्स या वेबसाइटच्या अभ्यासानुसार ९ नोव्हेंबर या एकाच दिवशी मोदींच्या ३ लाख १८ हजार फॉलोअर्सनी त्यांना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. मोदींच्या एकूण फॉलोअर्सची संख्या सव्वादोन कोटींच्या आसपास असून, त्यात भारतातील फॉलोअर्सच अधिक आहे. त्यांच्या फॉलोअर्समध्ये सतत वाढ होत असताना, एकाच दिवशी झालेली इतकी मोठी घट धक्कादायक मानली जात आहे. त्या आधी म्हणजेच ९ नोव्हेंबरच्या आधीच्या आठ दिवसांत मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत रोज सुमारे २५ हजारांची भर पडत होती. असे असताना एके दिवशी इतक्या ट्विटर फॉलोअर्सनी मोदी यांना रामराम ठोकावा, हे त्यांना निर्णय मान्य नसल्याचे कारण आहे, असेच म्हणता येईल.ट्विटर फेक वा बोगस अकाउंट डिलीट करते तेव्हा असे घडत असते. पण अशा वेळी एका नव्हे, तर सर्वच राजकीय नेत्यांचे फॉलोअर्स कमी झाल्याचे दिसून येते. यावेळी मात्र केवळ मोदी यांचे फॉलोअर्स वाढले आहेत. एवढेच नव्हे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच फॉलोअर्स मात्र वाढले आहेत. बनावट अकाउंट्स डिलीट झाल्यामुळे ही घट झाली आहे, असे ट्विटरतर्फे सांगण्यात येत आहे. ते खरे असेल, तर मोदी यांचे इतके फॉलोअर्स बोगस वा बनावट होते, असा त्याचा अर्थ निघतो. ते खरे नसेल, तरीही भाजपासाठी ही चिंतेची बाब असू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींचे फॉलोअर्समध्ये घटले
By admin | Published: November 12, 2016 2:50 AM