नवी दिल्ली - अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ ऑगस्ट भूमिपूजन होत आहे. या भूमीपूजनाच्या समारंभाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोजकांनी दिलेले नाही. अर्थात अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आलेले नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपवाद आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, हा प्रश्नच निकाली निघाला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थितीच राज्यघटनेला धरुन नसल्याचा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला आहे.
असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा सवालही औवेसी यांनी उपस्थित केला आहे. आऊटलूक या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत औवेसी यांनी बाबरी मशिद आणि अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनसंदर्भात आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. तर, उद्धव ठाकरेंनीही अप्रत्यक्षपणे सध्या तिथं जाण्याची वेळ नसल्याचे म्हटलंय.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला मानपान सगळं मिळालं. तेही शिवसेनाप्रमुखांचां मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल. मी व्यवस्थित जाईन. मी पूजाआर्चा करून किंवा कार्यक्रमात सहभाग होऊन परत येईन. पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाही. एखाद्या गावातील मंदिर बांधायचं म्हटलं तर गावकरी एकदिलाने एकत्र येतात. त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत. लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचं काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.