नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआय टीम प्रयत्न करत आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी काँग्रेस पुढे आली आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पी.चिदंबरम यांची पाठराखण करत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर आरोप लावला आहे की, मोदी सरकार ईडी, सीबीआय आणि काही माध्यम समुहांना हाताशी धरत पी. चिदंबरम यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. तर प्रियंका गांधी यांनी सत्तेला सत्य चालत नाही असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे. हायकोर्टाने पी. चिदंबरम यांची अंतरिम जामीन याचिका फेटाळून लावल्यानंतर ते भूमिगत झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा मिळाला नाही. चिदंबरम यांना लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलं आहे त्यामुळे ते आता परदेशात जाऊ शकणार नाही.
राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलंय की, मोदी सरकार ईडी, सीबीआय आणि माध्यम यांना हाताशी धरुन पी.चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करत आहेत. सत्तेचा अशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे त्याचा मी निषेध करतो.
तर अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्विट करत चिदंबरम यांचे समर्थन केलं आहे. या प्रकरणात सनसनी पसरविण्याचे काम केलं जातंय त्यामुळे एका मोठ्या राजकीय नेत्याचं व्यक्तिगत बदनामी होईल. काल संध्याकाळी ते ६.३० पर्यंत ते माझ्यासोबत एका कायदेशीर विषयावर चर्चा करत होते ते पळून गेलेत असं कसं म्हणता येईल अशी टीका केली आहे.
चिदंबरम केंद्रीय वित्तमंत्री असताना २००७ मध्ये ‘आयएनएक्स मीडिया’ला ३०५ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्याची मुभा विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिली होती. मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गैरमार्गाने ही परवानगी दिली गेली, या आरोपांवरून सीबीआयने मे २०१७ मध्ये गुन्हा नोंदविला. नंतर सन २०१८ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने त्याच प्रकरणात ‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा नोंदविला. या दोन्ही प्रकरणांत इतरांसोबत पी. चिदंबरम व त्यांचे चिरंजीव कार्ति चिदम्बरम यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कार्ति चिदंबरम यांना मात्र या आधीच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.