मौन सोडले : विद्वेष खपवून घेणार नाही, कट्टर धर्मवाद्यांना पंतप्रधानांचा इशारानवी दिल्ली : संघ परिवारातील संघटना ‘घर वापसी’सारख्या कार्यक्रमांनी हिंदू अजेंडा नेटाने पुढे नेत असूनही आणि गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत चर्च व ख्रिश्चनांच्या शाळेवर हल्ले झालेले असूनही गप्प राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अखेर मौन सोडले. माझे सरकार प्रत्येक नागरिकास स्वत:च्या श्रद्धेनुसार कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल व अल्पसंख्य वा बहुसंख्यांनी इतरांविरुद्ध धार्मिक विद्वेष पसरविणे अजिबात खपवून घेणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.कुरियाकोस एलियास चावरा आणि मदर युफ्रेशिया या केरळमधील गेल्या शतकातील दोन ख्रिश्चन धर्मप्रचारकांना पोपनी संतपद बहाल केल्यानिमित्त रोमन कॅथॉलिक चर्चने येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या राष्ट्रीय आनंदोत्सवात मोदी बोलत होते.पंतप्रधान म्हणाले, की माझे सरकार सर्वच धर्मांचा समान सन्मान करेल आणि अल्पसंख्य असोत वा बहुसंख्य, कोणालाही उघडपणे अथवा छुपेपणाने इतर धर्मीयांविषयी वैरभाव पसरवू देणार नाही.धर्माच्या नावाने टोकाची भूमिका घेणाऱ्यांना कडक इशारा देताना मोदी म्हणाले, की कोणत्याही सबबीखाली कोणत्याही धर्माविरुद्धचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही़ व सरकार अशा हिंसाचाराचा तीव्रतेने निषेध करते. अशा शक्तींविरुद्ध सरकार कठोर उपाय योजेल.जगात धर्माच्या नावाने दुही आणि हिंसाचार वाढीस लागला आहे व हा आता जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले, की सर्वच धर्मांनी परस्परांना सन्मानाने वागवावे ही प्राचीन भारतीय शिकवण जागतिक पातळीवर समर्पक ठरू लागली आहे. ते म्हणाले की, जग आज एका दुहेरी मार्गावर उभे आहे व हा मार्ग नीटपणे पार केला नाही तर आपण सर्वजण पुन्हा एकदा मतांधता, धर्मवेड आणि रक्तपाताच्या काळ््याकुट्ट कालखंडात ढकलले जाऊ. जगाने तिसऱ्या सहस्त्रकात प्रवेश केला तरी विविध धर्मांमधील सुसंवादी अभिसरण अद्याप आपल्याला साधता आलेले नाही.गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीचे स्मरण देत मोदी म्हणाले की, सर्व धर्मांविषयी आदर प्रत्येक भारतीयाच्या रक्तात भिनायला हवा. ते म्हणाले की संयम, परस्परांविषयी सन्मान आणि सहिष्णुता हाच या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा गाभा असून, तोच भारतीय राज्यघटनेतही प्रतिबिंबित झाला आहे. देशातील सर्वधर्मीयांनी याचे अनुकरण करावे, असेही त्यांनी आवाहन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)ओबामांनी टोचले होते कानच्प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल कान टोचले होते. भारताने धार्मिक सलोखा व सहिष्णुतेचा मार्ग सोडला नाही तरच भारत महाशक्ती म्हणून जगाच्या आदरास पात्र ठरू शकेल, असे दिल्लीतील जाहीर भाषणात म्हणाले होते. नंतर वॉशिंग्टनला परतल्यावर त्यांनी असे भाष्य केले होते की, गेल्या काही वर्षांत भारतात सर्वच धर्मांच्या अनुयायांना जो असहिष्णुततेचा अनुभव येत आहे, त्याने महात्मा गांधी यांनाही धक्का बसला असता.मोदी राहिले होते गप्पच्संघ परिवारातील व काही हिंदू नेत्यांची वक्तव्ये आणि ‘घर वापसी’सारख्या कार्यक्रमांवरून गेल्या अधिवेशनात सतत गोंधळ होऊन संसदेचे कामकाज पाच-सहा दिवस बंद पडले होते. विरोधकांनी मागणी लावून धरूनही मोदी यांनी संसदेत वक्तव्य केले नव्हते. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या ‘रामजादे’ व ‘हरामजादे’ विधानावरून गोंधळ झाला, तेव्हा मोदींनी ५ डिसेंबर रोजी लोकसभेत केवळ एका वाक्याचे निवेदन केले होते- संसदेत हा विषय उपस्थित होण्याआधीच माझ्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत मी अशी भाषा न वापरण्याची कडक शब्दांत ताकीद दिली होती व माझी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.कोणत्याही दबावाला अथवा आमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकास आपल्या पसंतीच्या धर्माचे आचरण सुरू ठेवण्याचा अथवा त्याचा स्वीकार करण्याचा हक्क बजावता येईल आणि (देशात) संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य राहील याची सरकार खात्री करेल.
मोदींनी दिली धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही
By admin | Published: February 18, 2015 2:49 AM