नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकापूर्वीची शेवटची 'मन की बात' केली. आजच्या मन की बात 'नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक'ची माहिती दिली. सोमवार 25 फेब्रुवारी रोजी या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं मोदींनी म्हटलंय. शेवटच्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर, लोकसभा निवडणुकांपूर्वीची मन की बात ही 'शहीद जवानांची बात' ठरली.
भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक जवान गमावले आहेत. देशभरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले. या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुबीयांनी दाखवलेलं धैर्य आणि देशभक्ती देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे. शहीद कुटुंबीयांच्या या धैर्यामुळे देशातील नागरिकांचा जोश अधिकच वाढल्याचेही मोदींनी म्हटले.
मुस्लिम देशांची ताकदवान संघटना असलेल्या ओआयसीने (OIC) आपल्या 46 व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगातील बहुतांश देश भारताच्या पाठीशी असून भारताला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाल्याचं मोदींनी म्हटले. देशातील जवानांच्या धाडसाचे आणि शौर्याचे नेहमीच कौतुक होते. मात्र, आजपर्यंत या शहीद जवानांचे एकही स्मारक नसल्याची खंत मोदींनी बोलून दाखवली. तर, दिल्ली गेटजवळ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. हे स्मारक शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असेल, असेही मोदींनी सांगितले. राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना ही, अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र या चार वीर चक्रांवर आधारित असल्याचेही मोदींनी सांगितले. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील नागरिकांसोबतच मीही या निवडणुकांमध्ये सक्रीय सहभागी असणार आहे. या निवडणुकीत मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे यानंतरची 'मन की बात' मे महिन्यातील शेवटच्या रविवारी होईल, असेही मोदींनी सांगितले.