नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे नागरिकांना कोरोना लसीचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक पल्ला गाठणे शक्य झाले, असे या लसींचे उत्पादन करणाऱ्या सात भारतीय कंपन्यांच्या धुरीणांनी म्हटले आहे. त्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेतली.
देशात कोरोना लसींवर चाललेले संशोधन, लसउत्पादनात येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसउत्पादक सात भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, झायडसकॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा, पॅनेशिया बायोटेक या कंपन्यांचा समावेश होता.