ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - ऑल इंडिया रेडिओवरील 'मन की बात' हा कार्यक्रम बलूच भाषेत प्रसारित करण्यास मोदी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मोदींची 'मन की बात' आता लवकरच बलुचिस्तानमध्ये ऐकायला मिळणार आहे. 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बलुचिस्तान नागरिकांवर प्रभाव पाडून पाकिस्तानला शह देण्याचा हेतू असल्याचे बोलले जात असले तरी रेडिओच्या माध्यमातून बलुचिस्तानचा आवाज बुलंद करण्याचे मोदी सरकारचा उद्देश असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट होत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारताला कोंडीत पकडण्याची रणनीती आखलेल्या पाकिस्तानला भारताने बलूच प्रकरणाला वाचा फोडून शह देण्याचा प्रयत्न केला होता.स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी बलुचिस्तान, गिलगिल-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी आपले आभार मानल्याचंही ते म्हणाले होते.
पाकिस्तानकडून बलूच नागरिकांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा पंतप्रधान नरेद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर लावून धरावा, अशी मागणी तेथील नेते व नागरिकांनी एकमुखाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेला बलूच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पाकिस्तानविरोधात तेथे निदर्शनेही करण्यात आली असून, कार्यक्रम सुरू करण्याविषयी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे तेथील जनतेला ठाम मतं मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.