मुंबई : राफेल खरेदीवरून कथित घोटाळ्यासंदर्भात मोदी सरकारची बाजू मांडताना भाजपच्याच दोन केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून अद्यापही गोंधळाची स्थिती असल्याचे दिसत आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डसॉल्टने रिलायन्सची निवड का व कशी केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत असे सांगितले. तर काही दिवसांपूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रिलायन्स एकटीच नसून इतर कंपन्यांच्या नावांसह आकडेही जाहीर करून टाकले होते.
सीतारामन आज मुंबईमध्ये इंडिया समिटसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी डसॉल्टने रिलायन्सला निवडले की नाही, की फक्त रिलायन्सची निवड केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसॉल्टलाच माहीत असल्याचे सांगत हात झटकले. याबरोबरच त्यांनी डसॉल्टने अद्याप संरक्षण मंत्रालयालाही याबाबत काही कळविले नसल्याचे सांगितल्याने भाजपचे वरिष्ठ मंत्रीच संभ्रमात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या उलट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप करत असताना माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद 22 सप्टेंबरला देशातील केवळ रिलायन्सच नाही, तर महिंद्रासह सहा कंपन्यांशी करार झाले आहेत. विमानासाठी लागणारे सुटे भाग याच कंपन्या बनविणार आहेत. याचबरोबर अन्य 100 कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत, अशी माहिती दिली होती.