राहुल गांधी मंदिरातून बाहेर पडताच गर्दीतून आल्या मोदी मोदींच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 04:12 PM2017-12-10T16:12:17+5:302017-12-10T16:13:05+5:30
अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.
अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी मोदींना 12वा प्रश्न विचारला आहे.
छोटे व्यावसायिक त्रस्त आहेत, तर मोठे उद्योगपती मस्त आहेत. छोट्या व्यावसायिकांना जीएसटी आणि नोटाबंदीचा सामना करावा लागतो आहे. गुजरातमधल्या सूरत, राजकोटमधले व्यापार नष्ट केले आहेत. मोदी सरकार याची जबाबदारी घेणार का ?, असा सवालही राहुल गांधींनी मोदींना विचारला आहे. गुजरातमध्ये काल पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान झालं आहे. ज्यात 68 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात यंदा कमी मतदान झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. 14 डिसेंबर रोजी दुस-या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मोदी-राहुल गांधी यांची परीक्षा
या निवडणुका म्हणजे 2019मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकांची चाचणी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधी यांच्यासाठी ही नेतृत्वाची परीक्षा आहे. मोदी यांनी सौराष्ट्र व दक्षिण गुजरातेत 15 सभा घेतल्या, राहुल गांधी 7 दिवस राज्यात होते आणि अनेक सभांत भाषणे केली.