नवी दिल्ली - भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसेच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने हा फोटो ट्विट करत अरब देशातील या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोसह त्यांनी संताप व्यक्त करणारा मजकूरही लिहिला आहे. मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी, असे ट्विट राजपूत यांनी केले आहे. अंबरीष गुप्ता यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.
दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आखाती देशांतील स्थलांतरीत कामगार 30 टक्के भारतीय
आखाती देशांसोबतच्या भारताच्या संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमध्ये प्रामुख्याने कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन यांचा समावेश होतो. या देशांमध्ये भारतीय काम करतात. आखाती देशात भारतीय वंशाच्या कामगारांचे महत्त्व यावरून दिसून येते की या देशांतील स्थलांतरित कामगारांपैकी ३० टक्के एकटे भारतीय आहेत.