नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या यंदाच्या कॅलेंडर आणि डायरीवर परंपरेनुसार चरखा चालविणाऱ्या महात्मा गांधींच्या फोटोऐवजी त्याच पोझमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यावरून वादंग झाल्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) संमती घेतल्याशिवाय पंतप्रधानांचे फोटो न छापण्याची ताकीद सरकारने आयोगास दिली आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) यासंदर्भात आयोगास सविस्तर मेमो पाठविला असून यंदाच्या कॅलेंडर व डायरीवर म. गांधीेंऐवजी मोदी यांचा फोटो छापण्याआधी ‘पीएमओ’ची परवानगीमागण्यात आली होती, हा आयोगाचा दावा साफ खोडून काढला आहे. यासंदर्भात झालेल्या वादातून जे मुद्दे उपस्थित झाले ते लक्षात घेऊन मंत्रालयाने पंतप्रधानांचे फोटो प्रकाशित करण्याच्या संदर्भात आयोगाला काही निश्चित नियमही ठरवून दिले आहेत. त्यानुसार पंतप्रधानांचा फोटा प्रकाशित करण्याआधी त्याचा प्रस्ताव या मंत्रालयाच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून तो मंजूर करून घेणे बंधनकारक केले आहे. शिवाय ज्यात पंतप्रधानांच्या नावाचा अथवा फोटोचा वापर करण्याची गरज भासेल असा कोणताही प्रायोजित कार्यक्रम करण्यापूर्वी आयोगाने ‘एमएसएमई’ खात्याचे मंत्री अथवा सचिव यांना पूर्वकल्पना द्यावी, असेही आयोगाला सांगितले. तसेच पत्रव्यवहारासाठी खासगी ई-मेल आयडी न वापरता फक्त सरकारी ई-मेल आयडीच वापरावा व तसे संबंधित अधिकाऱ्यांना बजावावे, असेही आयोगास मेमोद्वारे कळविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)आयोगाचे अध्यक्ष गप्पया मेमोच्या संदर्भात विचारले असता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही.के. सक्सेना यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. याआधी महात्मा गांधींना हटवून मोदींना पुढे करण्याच्या आयोगाच्या या कृतीवर गांधीवाद्यांकडून व विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली तेव्हा सक्सेना म्हणाले होते की, आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर फक्त महात्मा गांधींचेच चित्र छापावे असा कोणताही नियम किंवा परंपरा नाही!
परवानगीशिवाय मोदींचा फोटो छापण्यास मनाई
By admin | Published: February 21, 2017 4:35 AM