नवी दिल्ली : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेणाऱ्या नितीशकुमारांनी बुधवारी सकाळी स्वत: फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले; मात्र पंतप्रधानांनी त्यांना आपली असमर्थता दर्शवली. आपल्याऐवजी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी उपस्थित राहतील असे कळवताना बिहारच्या आघाडी सरकारला पंतप्रधानांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.पाटण्याच्या गांधी मैदानावर २0 नोव्हेंबर रोजी नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्याचे निमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक व ओमर अब्दुल्ला, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. ममता बॅनर्जी व केजरीवाल यांनी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची स्वीकृती बुधवारपर्यंत कळवली आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र शपथविधीऐवजी डिसेंबर महिन्यात आपण नितीशकुमार यांची भेट घेऊ असे कळवले. भाजपच्या सूत्रांशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी सरकारला अथवा भाजपला कोणताही धोका संभवत नसल्याचे स्पष्ट करीत खुलासा केला की भाजपच्या अपेक्षेनुसार विविध राज्यांत परस्परांविरुद्ध लढणारे प्रादेशिक पक्ष उदा. प. बंगालमधे तृणमूल आणि डावे, तामिळनाडूत द्रमुक आणि अद्रमुक, उत्तर प्रदेशात समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष सहजासहजी एकत्र येण्याची शक्यता नाही.
नितीश कुमार यांच्या शपथविधीकडे मोदींची पाठ
By admin | Published: November 19, 2015 3:42 AM