नवी दिल्ली : निवडणूक प्रचारात पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल कॉँग्रेसचे (टीएमसी) ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील भद्रेश्वर येथील सभेत मोदी यांच्यावर मंगळवारी कडाडून हल्ला चढविला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदी यांनी केलेले विधान घटनाबाह्य आहे. आमच्या पक्षाचे काम कार्यकर्त्यांच्या त्यागावर चालते. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. एक कार्यकर्ता पक्ष सोडून गेला तर आम्ही १ लाख आणखी कार्यकर्ते निर्माण करू. मोदी यांच्या अशा विधानामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. घटनात्मक पदावर असतानाही ते घटनेचे उल्लंघन करत आहेत. त्यांना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार नाही. टीएमसीचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा सोमवारी श्रीरामपूर येथील सभेत करताना मोदी म्हणाले होते की, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा विजय होईल, त्या वेळी आमदार टीएमसी सोडतील. याबाबत तृणमूल कॉँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून मोदी यांचे वक्तव्य निराधार, अनुचित, अवैध तसेच उत्तेजक आहे, असे म्हटले आहे. अशा वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि वाराणसीमधील त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. असे वक्तव्य करून मोदी चुकीच्या पद्धतीने मतदारांवर प्रभाव टाकत आहेत. मोदी यांच्याकडे याबाबत काय पुरावे आहेत, याचीही मागणी आयोगाने करावी. ते पुरावे देऊ शकले नाहीत तर त्यांचे वक्तव्य भडकावू आणि लोकशाहीविरोधी समजावे. त्यांची वाराणसीमधील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.
७२ वर्षे बंदी घाला - अखिलेश यादवसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोदी यांचे भाषण चुकीचे आहे, असे म्हटले आहे. अखिलेश यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदी यांनी सामान्यांमधील विश्वासार्हता गमाविली आहे. मूल्यहीन पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमधील ४० आमदारांबद्दल विधान केले आहे. त्यांच्यावर ७२ तास नव्हे, ७२ वर्षे बंदी घातली पाहिजे.