नवी दिल्ली - जागतीक पातळीवरच्या 'टाईम' मासिकाच्या कव्हरस्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'डिव्हाईडर इन चिफ' असा उल्लेख करण्यात आला. त्यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, कव्हर स्टोरी लिहिणारा लेखक पाकिस्तानी असून त्यावरून लेखकाची विश्वासहर्ता लक्षात येते. मोदींना 'डिव्हाईडर ईन चीफ' म्हटल्यामुळे भारतात मोठा वाद झाला होता. त्यावर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
टाईम मासिक हे परदेशी आहे. तर लेखकाने स्पष्ट केलं की, आपण पाकिस्तानमधील राजकीय कुटुंबातून आलो आहोत. हे मुद्दे त्या लेखकची विश्वासहर्ता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, असंही मोदींनी म्हटले. टाईम मासिकातील कव्हरस्टोरी आतिश तासीर यांनी लिहिली होती. जगातील सर्वात मोठी लोकशाही आता विभागली गेली, अशा आशयाची स्टोरी तासीर यांनी लिहिली होती. मॉब लिंचिग, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनविणे, प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी अशा घटनाचा उल्लेख लेखात करण्यात आला होता. तसेच मोदींनी या घटनांवर चकार शब्द काढला नसल्याचे म्हटले होते.
याच कव्हर स्टोरीमध्ये विरोधी पक्षावर देखील टीका करण्यात आली होती. राहुल गांधी यांना अत्यंत साधारण व्यक्ती म्हणून दाखविण्यात आले होते, ज्याला शिकवता येणार अशी प्रतिमा राहुल यांची मांडली होती.
याआधी टाईमने मोदींचे कौतूक करणारी स्टोरी केली होती. ज्याला 'मोदी इज इंडियाज बेस्ट होप फॉर इकोनॉमीक रिफॉर्म' असा मथळा देण्यात आला होता. तर २०१५ मधील स्टोरीला 'व्हाय मोदी मॅटर्स' असा मथळा देण्यात आला होता.
दरम्यान नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या टाईमच्या स्टोरीवर भाजपने जोरदार टीका केली होती. तसेच लेखक पाकिस्तानी असून त्यांचा मुद्दा पाकिस्तानला फायदेशीर असल्याचा आरोप केला होता. तसेच पाकिस्तानी लेखकाकडून चांगल्याची अपेक्षा करता येणे शक्य नसल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले होते.