चिकमंगळूर : भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौºयावर असून, तिथे रवाना होण्यापूर्वीही त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चीनशी मिठ्या मारून झाल्या, दोन्हीकडील सैन्याने डोकलाममधून माघार घेतल्याचे सांगण्यात आले. पण आता तिथेच चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत आहे, रस्तेबांधणी करीत आहे. थंडीसाठी आपल्या जवानांच्या तंबूंची सोय करीत आहेत. मात्र त्यावर आपले पंतप्रधान काहीही बोलायलाच तयार नाहीत.चिकमंगळूरमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल, अशी खात्री व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर २0१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत मोदी व भाजपाचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी गेली चार वर्षे मोठमोठ्या गप्पाच मारत आहेत. मात्र जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. पंतप्रधान मोदी सत्य धर्माचे पालन करीत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.आपणच या देशात सारे काही केले आणि आपण पंतप्रधान होण्यापूर्वी देशात काहीच नव्हते, अशा थाटात मोदी वागत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव असे अनेक पंतप्रधान देशाने पाहिले. मात्र एकही पंतप्रधान या पद्धतीने वागला नाही. आपणच सारे काही आहोत, असे यापैकी एकाही पंतप्रधानाने भासवले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.शृंगेरी पीठाला भेटआणीबाणीनंतर रायबरेलीतून पराभूत झाल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चिकमंगळूरमधून १९७८ साली विजयी झाल्या होत्या. त्याच मतदारसंघात आज राहुल गांधी आले होते. तिथे त्यांनी शृंगेरी शारदा पीठालाही भेट दिली. आदी गुरू शंकराचार्यांनी १८व्या शतकात या पीठाची स्थापना केली होती. राहुल गांधी यांनी तिथे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ स्वामी यांचेही आशीर्वाद घेतले.
भ्रष्ट नेत्यांसोबत मोदींची ऊठबस; कर्नाटक दौऱ्यात राहुल गांधींची भाजपावर सडकून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:15 AM