नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून आदर्श आचार संहितेच कुठेही उल्लंघन झालं नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नरेंद्र मोदींच्यावर्धा येथील भाषणाची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा आचारसंहितेचा भंग होईल, असे वक्तव्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणासंदर्भात आपले मत मांडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली. याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी (2 मे रोजी) होईल. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाला काही निर्णय घ्यायचा असल्यास, आयोगाला तशी परवानगी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यामुळे आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची तपासणी केली असता, त्यात काहीही गैर नसल्याचे मत नोंदवले आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठात मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली. काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांचे ज्येष्ठ वकील, अभिषेक मनु संघवी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून मोदी आणि अमित शहांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाकडून कुठलिही कारवाई होत नसल्याचे या 146 पानांच्या याचिकेत म्हटले आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, मोदी आणि शाह द्वेषपूर्ण विधाने करत आहेत. आपल्या भाषणात सैन्यातील जवानांचा वापर करत आचारसंहिता भंग करत आहेत. निवडणूक आयोगाला अशी 40 प्रकरणे लक्षात आणून दिली, तरीही आयोगाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे या याचिकेत म्हटले आहे.