पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका करीत अशा व्यक्तीला जनतेने पंतप्रधान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संयोजक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी मोदी व पवार यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकांनंतर एच.डी. देवेगौडा यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होईल, याचा आंबेडकर यांनी पुनरुच्चार केला. भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही. मोदींचे संतुलन बिघडल्याने अशा व्यक्तीस जनतेने पुन्हा पंतप्रधान पदावर बसवू नये. राज्यातील निकालांबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. त्यामुळे मलाही सांगता येणार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीला मान्यताप्राप्त पक्ष होण्याइतपत जागा नक्की मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला.निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी लगेच दुष्काळी गावांचा दौरा केला. त्यानंतर आम्ही दुष्काळी दौरा केल्यामुळे राज्य शासनाला जाग आल्याचा दावा पवार यांनी केला. पवार यांचे नाव न घेता आंबेडकर म्हणाले, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ही आमची संस्कृती नाही. मीही अनेकवेळा दुष्काळी भागांचा दौरा केला आहे. पण त्याबाबत कधीच मार्केटिंग केले नाही. एक सत्तेवर बसले आहेत. आणि दुसरे ५० वर्ष सत्तेत होते. त्यांनी दुष्काळी निवारणासाठी किती प्रयत्न केले आहेत? उलट आपल्या मतदारसंघात पाणी पळविले.पवार यांची भीती अनाठायीबारामतीत वेगळा निकाल लागला तर ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. पवार यांची ही भीती अनाठायी आहे. बारामतीमध्ये झालेल्या विकासकामांमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 6:07 AM