ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 30 - नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनंतरचे तिसरे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, असं वक्तव्य ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. 66 वर्षांच्या नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि अपील जातीय बंधनांना झुगारून टाकत विकासाचा मार्ग प्रशस्त करत असल्याचं ते म्हणाले आहेत. ते दिल्लीतल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंडिया समिट -2017मध्ये बोलत होते. भारताच्या इतिहासात नरेंद्र मोदी सर्वात तिसरे यशस्वी पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत. मोदी असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांच्याकडे इंदिरा गांधी आणि नेहरूंनंतर पूर्ण भारताच्या विकासाचा दृष्टिकोन आहे. हे सर्व नेतृत्वगुण यापूर्वी फक्त नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याकडे होते. मात्र आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व शक्ती, नियंत्रणाची क्षमता, जातीच्या पार पाहण्याचा दृष्टिकोन, प्रादेशिक आणि भाषिक अपील पलीकडे पाहण्याच्या गुणांनी अंतर्भूत आहे, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी महिलांवर होणा-या अन्यायावरही टीकेचे आसूड ओढले आहेत. भारतीय राजकारणात नेहमीच महिलांसोबत भेदभाव करण्यात येतो. इस्माल आणि हिंदू हे दोन्ही धर्म या महाद्विपावरील सर्वात मोठे धर्म आहेत. यात महिलांसोबत मोठ्या प्रमाणात भेदभाव होत असतो. ते म्हणाले, जाती प्रथा, सामाजिक स्तराची सर्वात कठोर प्रणाली ही मनुष्यानं विकसित केली असून, हिंदूंनी त्याला आकार दिल्याचंही ते म्हणाले आहेत.
नेहरू व इंदिराजींनंतर मोदी तिसरे यशस्वी पंतप्रधान- रामचंद्र गुहा
By admin | Published: March 30, 2017 5:08 PM