ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं. संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी खतरा असल्याचं सांगण्यात आलं तसंच याचा खात्मा करण्याचं आवाहन करण्यात आलं. संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.
पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना भारत आणि अमेरिका मिळून इस्लामिक दहशतवादाचा खात्मा करेल असं ते म्हणाले. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्यावर इंटेलिजन्सची माहिती देण्यावरही सहमती झाली आहे. आम्ही दहशतवाद आणि दहशतवादाच्या सुरक्षित ठिकाणांना लक्ष्य करू असं ट्रम्प म्हणाले. पुढच्या महिन्यापासून अमेरिका, जापान आणि भारताच्या नौसेनेचा आतापर्यंत सर्वात मोठा संयुक्त सराव होणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. याशिवाय अफगाणिस्तानमध्ये भारताने केलेल्या सहयोगाबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले.
दोन्ही देशांना दहशतवादाच्या राक्षसाने नुकसान पोहोचवलं-
""भारत-आणि अमेरिकेची रक्षा भागिदारी अत्यंत महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशांना दहशतवादाच्या राक्षसाने नुकसान पोहोचवलं आहे. कट्टरपंथी विचार संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही इस्लामिक दहशतवादाचा खात्मा करू"" असं संयुक्त निवेदनामध्ये म्हटलं आहे.
""आमच्यात झालेली आजची चर्चा अनेक कारणांसाठी खूप महत्वाची आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाच्या मुद्यावर आमची खोलवर चर्चा झाली. या गंभीर समस्येपासून आपल्या समाजाची रक्षा करणं आमच्यासाठी प्राथमिकता"" असल्याचं संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले.
सईद सलाउद्दीन "आंतरराष्ट्रीय दहशतवादी"-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वीच पाकिस्तानात बसून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणारा हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीनला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. दरम्यान, दहशतवादी संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा फार मोठा झटका ठरणार आहे.