ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ : ४ जूनपासून मोदी स्वित्झर्लंडसह ५ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, या दौऱ्यामुळे काळा पैसा परत आणण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या असाव्यात का? २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी काळा पैसा विदेशातून आणण्याचे आश्वासन दिले होते. स्वीस बँकेत भारतीयांना ठेवलेला काळा पैसा हुडकून काढण्यात सहकार्य देण्याबाबत ते स्वीत्झर्लंडचे अध्यक्ष जोहान स्नीदर अम्मान यांच्याशी चर्चा करतील. करासंबंधी मुद्यांबाबत आपसूक माहितीचे आदान- प्रदान करता यावे यासाठी मार्ग प्रशस्त करण्याबाबत दोन देशांच्या अधिकाऱ्यांनी कराराला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारत आणि अन्य देशांना कराबाबत आपसूक माहिती देणारी यंत्रणा आणण्यासंबंधी वटहुकुमाबाबत स्वीस सरकारने १८ मेपासून सल्लामसलतीची प्रक्रिया अवलंबली आहे.
अलीकडेच मोदींनी एक छोटेखानी विदेश दौरा आटोपला असताना ४ जूनपासून ते अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे, १४०० कोटी रुपये खर्चून अफगाणिस्तानात बांधण्यात आलेल्या सलमा धरणासाठी भारताने निधी दिला असून मोदी या भेटीत या धरणाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते ऊर्जासंपन्न कतार आणि स्वीत्झर्लंडला भेट देतील.