तिरुवम्बडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळविषयी दाखविलेली आत्मीयता बेगडी आहे अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना मोदींनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे असा आरोपही त्यांनी केला.
अमेठीतून पराभूत झाले असले तरी केरळमधीलवायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे वायनाडमधील मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौºयाच्या शेवटच्या दिवशी कोझीकोळ जिल्ह्यातील ऐंगपुझा या ठिकाणी जाहीर सभेत राहुल गांधी रविवारी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मान्य नसणाऱ्यांवर भाजपला राग आहे. या पक्षाने देशभरात विद्वेष पसरवला आहे. भाजपची व बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळी वागणूक देतात. उत्तर प्रदेशला नरेंद्र मोदी जितकी मदत करतात तितकी ते केरळला करणार नाहीत. कारण या राज्यात माकपचे सरकार आहे. पंतप्रधानांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा नाही.
केरळच्या गुरुवायूर येथील कृष्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले होते की, निवडणुकांमध्ये मिळणाºया मतांवर डोळा ठेवून भाजप काम करत नाही. आम्हाला देश घडवायचा आहे, समर्थ बनवायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा आणखीन वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये काही वैचारिक मतभेद जरूर आहेत. मात्र ते बाजूला सारून वायनाड व केरळच्या विकासासाठी आम्ही एकत्रितरित्या काम करू.