मोहाली: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 24 तासातील ही दुसरी घटना आहे. न्यूज एजेंसी ANI ने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे. विशेष म्हणजे, काल रात्री गुप्तचर विभागाच्या आवारात ग्रेनेड हल्ला झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
आज(मंगळवार) पंजाबपोलिसांनी मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयात काल रात्री झालेल्या स्फोटाबाबत पत्रकार परिषद घेतली. पंजाबचे डीजीपी म्हणाले की, आमच्याकडे या प्रकरणाचा सुगावा आहे आणि लवकरच आम्ही हे प्रकरण निकाली लावू. दरम्यान, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये टीएनटी(TNT) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काल रात्रीही झाला हल्लामोहालीच्या सेक्टर 77 मध्ये असलेल्या पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात सोमवारी रात्री 7.45 च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीच्या एका मजल्यावरच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. कारमधून आलेल्या संशयितांनी हा स्फोट घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड(RPG)ने हा हल्ला करण्यात आला आहे.
काही संशयित ताब्यातया हल्ल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक व्हीके भवरा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती दिली. दरम्यान, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे.