मोहाली: पंजाबच्या मोहाली येथील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात सोमवारी रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड(RPG) हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ग्रेनेड हल्ल्यात इमारतीच्या एका मजल्यावरील खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. या हल्ल्यामागे खलिस्थनी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
नेमकं काय झालं?मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीच्या सेक्टर 77 मध्ये असलेल्या कार्यालयात संध्याकाळी 7.45 च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीच्या एका मजल्यावरच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. कारमधून आलेल्या संशयितांनी हा स्फोट घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
मुख्यंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासनया हल्ल्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या निवेदनात मान म्हणाले की, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. पंजाब पोलिस मोहालीतील स्फोटाचा तपास करत आहेत. हल्ल्यातील आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
हरियाणातून संशयित दहशतवादी अटकेतविशेष म्हणजे पंजाबला लागून असलेल्या हरियाणातील कर्नालमध्ये चार दिवसांपूर्वी पोलिसांनी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला होता. खलिस्तानी दहशतवाद आणि आयएसआयशी संबंधित पंजाबमध्ये राहणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी शस्त्रे आणि आरडीएक्ससह अटक केली होती. या चौघांनाही कर्नाल येथील बस्तारा टोल येथून अटक करण्यात आली. हे चौघे एका इनोव्हा कारमधून जात होते.