नवी दिल्ली : भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याविरोधात मोहाली न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. मोहाली न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटमध्ये तेजिंदरपाल सिंग बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात यावे, असे म्हटले आहे. असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
दुसरीकडे, पंजाब पोलिसांनी शुक्रवारी तेजिंदरपाल सिंग बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील जनकपुरी येथील निवासस्थानातून अटक केली होती. मात्र शहर पोलिसांनी त्यांना हरयाणाहून राष्ट्रीय राजधानीत परत आणले, कारण पंजाब पोलिसांनी त्यांना अटकेबद्दल माहिती दिली नाही. दरम्यान, तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी आपल्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. आम्ही आवश्यक सुरक्षा व्यवस्था करू, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तेजिंदरपाल सिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सकाळी 8 च्या सुमारास काही लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांनी मुलाचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर सिंग बग्गा यांना गेल्या महिन्यात मोहाली येथे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
तेजिंदरपाल सिंग बग्गा कोण आहेत?36 वर्षीय तेजिंदरपाल सिंग बग्गा हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव आहेत.तेजिंदर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत ते दिल्लीच्या हरीनगर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार होते. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या ट्विटर खात्यावर 9.18 लाख फॉलोअर्स आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळेच त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती, असे म्हटले जाते. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना 2017 मध्ये दिल्ली भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आले होते.