औरैया:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिना यांची बरोबरी केल्याबद्दल अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. योगी शनिवारी औरैयामध्ये म्हणाले की, 'मोहम्मद अली जिना आणि सरदार पटेल एक असू शकत नाहीत. सरदार पटेल हे देशातील संस्थानांचे एकत्रीकरण करून भारताचे एकीकरण करणारे नेते आहेत, तर दुसरीकडे मोहम्मद अली जिना भारताचे तुकडे करणारे नेते आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शनिवारी औरैयामधील एका कार्यक्रमात बोलताना योगी म्हणाले की, सरदार पटेल आणि जीना यांची बरोबरी करू पाहणाऱ्यांनी सावध राहावे. येणाऱ्या निवडणुकीत जनता अशा लोकांना योग्य उत्तर देईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एक केला होता.
योगी पुढे म्हणाले की, आधी राज्यात नेहमी दंगली व्हायच्या, पण आता दंगलखोरांच्या सात पिढ्या दंगल करण्याचा विचार करत नाहीत. राज्यात 70 वर्षांत केवळ 12 वैद्यकीय महाविद्यालये बांधली, मात्र भाजप 75 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये देणार आहे. आधीच्या सरकारमध्ये सणासुदीला छोट्या व्यापाऱ्यांना लुटले जायचे, पण आता व्यापारी चांगल्या प्रकारे व्यापार करतोय. मी यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अशी केली आहे की, आता दंगलखोरांच्या सात पिढ्याही दंगल करणार नाहीत. आम्ही राज्यातील सर्वांचा विकास केला आहे, पण कोणाचेही तुष्टीकरण केले नाही.
काय म्हणाले अखिलेश यादव ?31 ऑक्टोबर रोजी हरदोई येथे विजयी रथ घेऊन आलेले समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव म्हणाले होते की, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना यांनी बॅरिस्टर म्हणून एकाच संस्थेत शिक्षण घेतले होते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागले तरी ते मागे हटले नाहीत. जे आज देशाविषयी बोलत आहेत ते जात-धर्मात आम्हाला आणि तुमच्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत. जाती-धर्मात विभागले तर आपल्या देशाचे काय होईल? असं ते म्हणाले होते.