दरभंगा- बिहारच्या दरभंगामधील एका तरूणाचं सध्या सगळीकडून कौतुक होत आहे. दोन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी या तरूणाने रोजा सोडला. नवजात चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी तिला रक्त देणं गरजेचं होतं म्हणून तिला रक्त देण्यासाठी त्याने रोजा तोडला. एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रमेश सिंह या जवानाला दोन दिवसांपूर्वी मुलगी झाली. पण मुलगी जन्माला आल्यावर तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलीला रक्ताची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी मोहम्मद अशफाक रक्तदान करायला तयार झाला. पण काही न खाता रक्तदान करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी काहीतरी खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला.
रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने अशफाकनेही रोजा ठेवला होता. पण मुलीचा जीव वाचवणं त्याला योग्य वाटल्याने त्याने रोजा सोडून रक्तदान केलं. 'एखाद्याचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सुरक्षा रक्षकाची ती मुलगी आहे यामुळेच मला प्रेरणा मिळाली', असं अशफाकने म्हटलं.
दरम्यान, याआधीही हिंदू व्यक्तीला वाचविण्यासाठी एका मुस्लीम तरूणाने रोज सोडल्याची घटना समोर आली होती. 20 वर्षीय अजय बिलावलम या तरूणाला कुष्टरोगाचं निदान झालं. त्याच्या रक्तातील पेशींचं प्रमाण घटायला सुरुवात झाली. रक्तातील पेशींचं प्रमाण झपाट्याने घटायला लागल्याने अजयच्या जीवाला धोका निर्माण झाला. तेव्हा अजयची मदत करण्यासाठी एक मुस्लीम व्यक्ती धावून आला. अजयला आरिफ खान या तरुणाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आरिफने अजयच्या वडिलांना फोन करून रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त करून रक्तदान केलं.