देशातील ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहेत. त्यामध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील विधानसभांचे निकाल आज येणार असून मिझोरमचे निकाल ४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. तेलंगणात ११९ जागांसाठी २ हजारांपेक्षा अधिक उमेदवार मैदानात आहेत. गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी असून बदलात्मक निकाल समोर येण्याची शक्यता आहे. यावेळी, माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुनद्दीनही निवडणुकीच्या मैदानात आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तेलंगणात काँग्रेसने लक्षवेधी आघाडी घेतली असून ६० पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. तर, केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे ३६ उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवार मोहम्मद अजहरुद्दीन हेही आघाडीवर असून यापूर्वीच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
हैदराबादमधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद अजहरुद्दीन काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. गत २०१८ साली या जागेवर टीआरएस पक्षाचे मंगती गोपीनाथ विजयी झाले होते. १६,००४ मतांनी काँग्रेसच्या विष्णूवर्धन रेड्डी यांचा पराभव झाला होता. यावेळी, मोहम्मद अजहरुद्दीन मैदानात असून भाजपने लंकाला दीपक रेड्डी यांना तिकीट दिले आहे. तर, एमआयएमनेही येथून मोहम्मद फराजुद्दीन यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात प्रत्येक तीनपैकी १ मुस्लीम मतदार आहे. त्यामुळे, येथून मोहम्मद अजहरुद्दीन आणि फराजुद्दीन यांच्यातही जोरदार लढत अपेक्षित आहे.
दरम्यान, अजहरुद्दीनने यापूर्वी २००९ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यानंतर, २०१४ साली राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, २०१९ साली कुठलीही निवडणूक न लढवता, अजहरुद्दीनने यंदाच्या विधानसभा मैदानात नशिब आजमावले आहे.
४ राज्यांच्या निकालांचे ताजे अपडेट पाहा -