मोहम्मद अझरुद्दीन हैदराबादमध्ये देणार ओवेसींना आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 04:56 PM2019-02-28T16:56:28+5:302019-02-28T20:12:17+5:30
काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता
नवी दिल्ली: हैदराबादचे खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात काँग्रेसकडून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ओवेसी यांच्याविरोधात अझरुद्दीन यांना मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसनं संपूर्ण तयारी केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं तेलंगणातल्या सर्वच्या सर्व 17 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
तेलंगणात गेल्या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी तेलंगणा प्रदेश काँग्रेसनं कार्यकारी अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये अझरुद्दीन यांच्या नावाचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वी अझरुद्दीन सिकंदाराबादमधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. सध्या भाजपाचे वरिष्ठ नेते बंडारु दत्तात्रय या मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र आता या मतदारसंघासाठी अझरुद्दीन यांचं नाव चर्चेत नाही.
मोहम्मद अझरुद्दीन यांना हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात हैदराबादमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा मतदारसंघ ओवेसी यांचा मजबूत बालेकिल्ला समजला जातो. ओवेसी सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची अझरुद्दीन यांची तयारी आहे का, याबद्दल राजकीय वर्तुळात सुरू आहे. 'पक्षाच्या हाय कमांडनं सांगितल्यास अझरुद्दीन हैदाराबादमधून निवडणूक लढवतील,' अशी माहिती तेलंगणा प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पीटीआयला दिली.
तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समितीची (टीआरएस) सत्ता आहे. टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवेसी यांना पाठिंबा देणार आहेत. या बदल्यात राज्यातल्या इतर १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये ओवेसी यांचा एमआयएम आपल्याला सहकार्य करेल, अशी अपेक्षा राव यांनी व्यक्त केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अझरुद्दीन उत्तर प्रदेशच्या मोरादाबादमधून विजयी झाले होते. मात्र २०१४ मध्ये राजस्थानच्या टोंक-माधोपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला.