Mohammad Yunus spoke to PM Modi :बांगलादेशात सत्तांतरानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळ काढला होता. त्यानंतर लोकांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने याबाबत बांगलादेशकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता बांगलादेशातल्या अंतरिम सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस हे माझ्याशी फोनवर बोलले. त्यांनी सद्यस्थितीवर विचार विनिमय केला असल्याचे म्हटलं आहे. यावेळी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.
यावेळी बांगलादेशातील लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील होण्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला आहे. तसेच, प्रोफेसर युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची हमी दिली. बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांशी बोललो आणि सर्व अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बांगलादेशसोबतचे मजबूत संबंध अधिक सुधारण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी हा फोन केला होता. सद्यस्थितीवर विचार विनिमय केला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले," असं पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत १४० कोटी भारतीय चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.