नवी दिल्ली : हवाला व्यवहार प्रकरणात (मनी लॉड्रिंग) सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी मोहम्मद वानी याला अटक केली. काश्मीरमधील फुटीरवादी शब्बीर शाह याच्याविरोधात दहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या खटल्यात मोहम्मद याला अटक झाली.ईडीच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार वानी याला श्रीनगर येथे सक्त वसुली संचालनालयाने राज्य पोलिसांच्या मदतीने अटक केली.दिल्ली न्यायालयाकडून वानी याच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट ईडीने नुकतेच मिळवले होते. या खटल्यात त्याने न्यायालयात हजर राहावे यासाठी अनेकवेळा ईडीने समन्स बजावले होते परंतु एकदाही तो हजर झाला नाही. वॉरंटची अमलबजावणी झाली असून आता त्याला हा खटला पुढे नेण्यासाठी शाह आणि इतरांसमोर चौकशीसाठी हजर केले जाईल. शब्बीर शाह याला ईडीने श्रीनगर येथे २६ जुलै रोजी अटक करून सध्या आपल्या कोठडीत ठेवले आहे.हवाला व्यवहाराचा हा खटला २००५ मधील आहे. ईडीने या दोघांचा तेव्हापासून पाठपुरावा केला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने वानी याला अटक केली. त्याने शब्बीर शाह याला २.२५ कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे.२०१० मध्ये दिल्ली न्यायालयाने वानी याला दहशतवादाला पैसा दिल्याच्या आरोपातून मुक्त केले परंतु शस्त्रास्त्र कायद्यान्वये दोषी ठरवले होते. शाह आणि वानी यांच्याविरोधात ईडीने हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला होता. वानी याने ६३ लाख रुपये मध्यपूर्वेतील देशांकडून हवाला व्यवहारांच्या माध्यमातून मिळवले या आरोपावरून त्याला २६ आॅगस्ट, २००५ रोजी अटक झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे वा दारुगोळाही जप्त करण्यात आला होता. चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की त्याने ५० लाख शाह यांना आणि दहा लाख रुपये जैश ए मोहम्मदचाएरिया कमांडर अबु बाकर याला श्रीनगरमध्ये दिले.
मोहम्मद वानीला हवालाप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 1:23 AM