हरिद्वार: अखंड भारताचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेहमीच अजेंड्यावर राहिला आहे. याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे. २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होईल. पण आपण जर थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांत आकाराला येईल, असं भागवत म्हणाले.
अखंड भारताच्या निर्मितीला रोखण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. कारण याच्यामध्ये कोणीही येईल तो संपेल, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीवर ज्याप्रकारे गोवर्धन पर्वत उचलला गेला, त्याचप्रकारे संतांच्या आशीर्वादानं भारत पुन्हा एकदा लवकरच अखंड भारत होईल. अखंड भारताची निर्मिती कोणीही रोखू शकणार नाही. सर्वसामान्यांनी थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांचं अखंड भारताचं स्वप्न १० ते १५ वर्षांत साकार होईल, असं भागवत म्हणाले.
अखंड भारताच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे. या मार्गात कोणीही आल्यास ते संपून जातील, असं विधान भागवत यांनी केलं. आपण सगळ्यांनी एक होऊन देशासाठी जगायची मरायची तयारी ठेवायला हवी. अखंड भारताच्या निर्मितीला २० ते २५ वर्षांचा कालावधी लागेल, असा मला वाटतं. आपण गती वाढवल्यास हाच कालावधी निम्म्यावर येईल आणि हे व्हायला हवं. आपण अहिंसेची भाषा करू. पण हातात काठीही ठेऊ. कारण हे जग सामर्थ्याची भाषा समजतं, असं भागवतांनी म्हटलं.