पाटणा: भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भागवत यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही लष्करी संघटना नाही. देशाला गरज पडल्यास आणि देशाच्या संविधानाने.... (भाषण करताना पॉझ घेतला) तर भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी सहा ते सात महिने लागतील. मात्र, आम्ही संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करून अवघ्या तीन दिवसात सैन्य उभारून सज्ज होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ती क्षमता आहे, असे भागवत यांनी सांगितले.
देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे.
सरसंघचालकांची यापूर्वीची काही विधानं
जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवतकाही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार केला होता. तसंच जेव्हा कुणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो, असंही मोहन भागवत यांनी म्हटले होते. यावेळी मोहन भागवत असे म्हणाले होते की, 'भारत आता पाकिस्तानला आपला शत्रू मानत नाही, पण पाकिस्तान भारताकडे मैत्रीच्या नजरेतून पाहण्यात अपयशी ठरला आहे'. 'हडप्पा आणि मोहेंजदाडो सध्या पाकिस्तानात आहे. ते भारताचा घटक आहेत, पण पाकिस्तान त्यांची दखल घेऊ इच्छित नाही. पाकिस्तान हिंदुत्व स्वीकारु इच्छित नसल्या कारणानेच एक वेगळा देश आहे', असंही ते म्हणाले होते. 'बांगलादेशमधील लोक बांगला भाषा बोलत असतानाही तो एक वेगळा देश कशासाठी ? कारण त्या देशाला हिंदुत्वासोबत जुळवून घेण्याची इच्छा नाही', अशी टीका मोहन भागवत यांनी यावेळी केली होती. मोहन भागवत यांनी सांगितल्यानुसार, हिंदुत्वानेच भारताला एकजूट ठेवलं आहे.
राज्यघटनेत ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ हवे कशाला? - मोहन भागवतराज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातले गेलेले ‘सोशलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द कायम ठेवावेत का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. ते म्हणाले की, ‘सोशलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द आणीबाणीत राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडले गेले. त्यापूर्वी ते नव्हते. आज प्रत्येक जण सोशलिस्ट शब्द स्वत:च्या सोयीप्रमाणे वापरतो. त्याच्या मूळ अर्थाचे औचित्यच हरवले आहे. भारत सेक्युलर आहेच मग घटनेत त्याचा उल्लेख कशासाठी? राज्यघटना तयार झाली त्या वेळीही ही चर्चा झालीच होती. राज्यघटनेच्या पुनर्विचाराची लगेच आवश्यकता नसली तरी घटनेच्या प्रस्तावनेत सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द असावेत काय, असे प्रश्न लोक विचारतात, गांभीर्याने त्याचा विचार झाला पाहिजे. रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक - मोहन भागवतरोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून भविष्यात संकट बनू शकतात असं स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होते. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भर पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे पण आपला विनाश करुन माणुसकी दाखवता येत नाही असं मोहन भागवत म्हणाले होते.