मोहन भागवतांनी देशाची माफी मागावी : राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:07 AM2018-02-13T01:07:56+5:302018-02-13T01:08:05+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांनी भारतीय लष्करावर अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जोरदार टीका केली.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांनी भारतीय लष्करावर अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जोरदार टीका केली. सीमेवर शत्रुंशी लढण्यासाठी भारतीय लष्कराच्या तयारीबद्दल शंका व्यक्त केल्याबद्दल भागवत यांनी क्षमा मागितली पाहिजे, असे गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
‘भागवत, तुम्ही हुतात्म्यांचा आणि आमच्या लष्कराचा अवमान केला आहे. तुमचा, धिक्कार असो’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भागवत यांचे भाषण हे प्रत्येक भारतीयाचा अनादर करणारे आहे, कारण जे देशासाठी लढले त्यांचा ते अपमान करणारे आहे. आमच्या ध्वजाचा तो अपमान आहे. कारण, प्रत्येक जवानाने त्याला वंदन केलेले असते, असेही गांधी म्हणाले.
विधानाचा विपर्यास : संघ
मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भारतीय लष्कराची तुलना केलेली नव्हती व याविषयावरील त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे संघाने सोमवारी म्हटले. सामान्य लोक आणि संघाचे कार्यकर्ते यांच्यात ती तुलना होती. भारतीय लष्कराशी ती दुरान्वयेही संबंधित नव्हती, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी निवेदनात म्हटले.
भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले, भागवतांचे ते वक्तव्य संघटनेच्या तत्परतेशी संबंधित असू शकते. संघाला लष्कराच्या शौर्याबद्दल व त्यागाबद्दल आदरच आहे. भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला. भागवत नेमके काय म्हणाले हे मला माहीत नाही. संघ कार्यकर्त्यांच्या तयारीबद्दल ते म्हणाले असू शकतात. संघ कार्यकर्ते देशाच्या संरक्षणासाठी नेहमी लष्कराच्या बाजुने उभे असतात.
काय म्हणाले होते भागवत
देशासाठी लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास, अवघ्या तीन दिवसांत ‘लष्कर’ उभारण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची आहे, असे संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी येथे म्हटले. संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भागवत म्हणाले, लष्कराला जवान तयार करण्यास ६ ते ७ महिने लागतात. संघ ते काम ३० दिवसांत करील. ही आमची क्षमता आहे. देशासमोर संकट उभे ठाकले व घटनेने तशी परवानगी दिली, तर स्वयंसेवक सीमेवर जायला तयार आहेत, असेही ते म्हणाले.