नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सतत धर्म आणि देवाचे नाव घेणाऱ्यांना सुनावलं आहे. संत ईश्वर सन्मान समारोह 2021 मध्ये बोलत असताना भागवत म्हणाले की, 'आपण जय श्री रामच्या घोषणा देतो, पण आपण त्यांच्यासारखे बनले पाहिजे. रामाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.'
भागवतांचा मोठा सल्ला
दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख भागवत म्हणाले की, 'आम्ही जय श्री रामचा नारा खूप जोरात लावतो. पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतात, आपण करू शकत नाही, असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यामुळेच अनेकजण रामाच्या मार्गावर जात नाहीत. रामाप्रमाणे स्वतःचा स्वार्थ सोडून लोकांचे भले करणे अवघड काम आहे.
भागवत पुढे म्हणतात, मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी सर्वांना आपला भाऊ मानला पाहिजे. सेवा आणि लोककल्याणाची कामे केवळ घोषणा देऊन होत नाहीत, तर त्यासाठी पूर्ण जाणीवेने जमिनीवर उभे राहून काम करावे लागते. गेल्या 75 वर्षात आपण त्या दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. पण,जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवून काम केले तर आपण हे ध्येय गाठू शकतो. RSS संघटना ही सेवा संबंधित कार्यक्रमांसाठीही ओळखली जाते, असे ते म्हणाले. तसेच, संघाचे स्वयंसेवक आणि संपूर्ण देशातील येणाऱ्या पिढ्याही मूल्यांनी परिपूर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय कुटुंबातील आचार-विचार प्राधान्याने लक्षात घेऊन काम करण्याचा सल्ला मोहन भागवत यांनी यावेळी दिला आहे.