गेल्या काही दिवसापासून भाजपा ओडिशामध्ये मुख्यमंत्रिपद कोणाला देणार या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे मोहन माझी राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. बुधवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मोहन माझी यांची मंगळवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
चार वेळा आमदार राहिलेले मोहन माझी हे आदिवासी समाजातून आले आहेत आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केओंझर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी बीजेडीच्या मीना माझी यांचा ११,५७७ मतांनी पराभव केला. माझी, आदिवासी चेहरा आहेत, त्यांचं सार्वजनिक क्षेत्रात मोठं काम आहे.
मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्रिपदाचाही प्रश्न सुटला आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावावरही एकमत झाले आहे. सहा वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते के.व्ही. सिंहदेव उपमुख्यमंत्री असतील. त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला नेत्या प्रवती परिदा याही उपमुख्यमंत्री असतील. निमापाड्यातून परीदा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
हा निर्णय भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला, यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
सर्व ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित खासदार-आमदारांशी चर्चा करून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर केले. या घोषणेनंतर सिंग यांनी माझी यांचे अभिनंदन केले. "मोहन माझी यांची ओडिशा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे," असे त्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तो एक तरुण आणि गतिमान पक्ष कार्यकर्ता आहे जो ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून राज्याला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेईल. त्याचे खूप खूप अभिनंदन, असंही सिंग यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.