Delhi Cabinet Minister Pankaj Singh: पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी राष्ट्रीय राजधानीतील रामलीला मैदानावर समारंभात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे इतर मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. रेखा गुप्ता यांच्यासह ६ आमदारांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पंकज सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. पंकज सिंह यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून सावरत पंकज सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दिल्लीत गुरुवारी नव्या सरकारच्या मंत्रिमंडाळाची शपथविधी पार पडला. यावेळी बिहारमधील बक्सरचे रहिवासी असलेले पंकज सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंकज सिंह यांनी दिल्लीच्या विकासपुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी आम आदमी पार्टीच्या महिंद्र यादव यांचा १३,३६४ मतांनी पराभव केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे पंकज सिंह यांना धक्का बसला होता. त्यानंतर बुधवारी पंकज सिंह यांच्या आईवर अंतिम संस्कार झाले. गुरुवारी पंकज सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मंत्रिपदाची शपथ घेण्याचा क्षण डॉ. पंकज सिंह यांच्यासाठी भावनिक होता. आईवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांनी २० फेब्रुवारीला मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांचा धाकटा भाऊ नीरज सिंह यांनी, आज आई हयात असती तर तिला खूप अभिमान वाटला असता, असं म्हटलं. तसेच पंकज सिंह यांच्या पत्नी रश्मी यांनीही, आज त्या नक्कीच आनंदी असतील. त्यांना नेहमीच त्यांचा मुलगा मंत्री व्हावा असे वाटत होते, असं म्हटलं.
पंकज कुमार सिंह यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९७७ रोजी झाला असून ते ४८ वर्षांचे आहेत. ते पदवीधर व्यावसायिक आहे. याआधी त्यांनी म्युनिसिपल कॉर्पोरेशन दिल्लीमध्ये कौन्सिलर म्हणून काम केले आहे. राजकीय आणि प्रशासकीय अनुभवासोबतच डॉ.पंकज सिंग हे खेळाचेही मोठे चाहते आहेत. दरवर्षी वडिलांच्या स्मरणार्थ ते बक्सरच्या धारौली गावात बाबू राजा मोहन स्मृती फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करतात. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील संघ सहभागी होतात आणि यामुळे स्थानिक तरुणांना खेळासाठी प्रेरणा मिळते.