अजमेर - ब्लू व्हेल गेम चॅलेंजनंतर आता इंटरनेटवर आणखी एका जीवघेण्या गेमनं धुमाकूळ घातला आहे. मोमो चॅलेंज असं या धोकादायक गेमचं नाव आहे. मोमो चॅलेंजमुळे भारतातील पहिला बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येमागील कारण मोमो चॅलेंज असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
(सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ)
आत्महत्या केलेल्या मुलीच्या मैत्रिणीनं मुलीच्या भावाला सांगितले होते की, 'मोमो चॅलेंजच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहोचण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती'. मुलीच्या भावानंही अशी माहिती दिली की, घर आणि शाळेतही रिकाम्या वेळेत बहीण मोमो चॅलेंज खेळत असायची.
दुसरीकडे, आत्महत्या करण्यापूर्वी तिनं हाताची नस कापून घेतल्याची माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मुलीनं परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं आयुष्य संपवत असल्याचं लिहिलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुलीच्या इंटरनेट हिस्ट्रीची तपासणी सुरू केली आहे. या धोकादायक गेमचं जाळ सध्या अमेरिका, अर्जेंटिना, फ्रान्स, मेक्सिको आणि जर्मनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यापूर्वी पहिला बळी अर्जेटिनामध्ये गेला होता. येथील एका 12 वर्षीय मुलीनं आत्महत्या करत जीव दिला होता. या खेळात अज्ञात नावानं धोकादायक चॅलेंज दिलं जातं.
असं आहे मोमो चॅलेंज- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाइलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं.
- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते.
- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.
- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं.
- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.