मुंबई - व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर जास्त वेळ घालवता असाल तर जरा सावधान. कारण अनेक धोकादायक गेम्सची सध्या चलती आहे. ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे.
मोमो नावाचं हे नवीन चॅलेंज ब्ल्यू व्हेलसारखंच आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं. त्यामुळे कोणताही अनोळखी नंबर सेव्ह करताना जरा काळजी घ्या. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात.
मोमो चॅलेंजमध्ये एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. या गेममध्ये वेगवेगळे टास्क दिले जातात. हे टास्क पूर्ण केले नाही तर कठोर शिक्षा देण्याची धमकी दिली जाते. मोमो चॅलेंजच्या माध्यमातून धमकी मिळल्यानंतर युजर घाबरतो आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यास तयार होतो. गेम खेळताना अनेक जण नैराश्यात जातात. तसेच पुढे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. हा जीवघेणा खेळ लहान मुलांना आणि तरुणांना प्रामुख्याने टार्गेट करतो.
असं आहे मोमो चॅलेंज
- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं.
- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते.
- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.
- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं.
- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.