लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये काेराेना काळातही माेठी वाढ झाली आहे. तब्बल २० हजार काेटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत माहिती जाहीर केली आहे.
स्विस बँकांमध्ये वर्ष २०१९ च्या अखेरीस सुमारे ६ हजार ६०० काेटी रुपये जमा हाेते. मात्र, गेल्या वर्षी काेराेना महामारीच्या काळातही त्यात तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. स्विस बँकांच्या भारतातील विविध शाखा तसेच इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून २० हजार ७०० काेटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. यापैकी ४ हजार काेटी रुपये बँक खात्यांमध्ये, ३१०० काेटी रुपये इतर बँकांमध्ये तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० काेटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. ग्राहकांच्या खात्यातील ठेवी मात्र घटल्या आहेत. हे अधिकृत आकडे असून भारतीयांनी दडविलेल्या काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.