उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे राज्यातील इतर धार्मिक स्थळांमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, गतवर्षी रामललांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या अयोध्येमध्येही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक तास रांगेत उभे राहून ते रामललांचं दर्शन घेत आहेत. तसेच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर दानही देत आहेत.
मागच्या २० दिवसांमध्ये राम मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान प्राप्त झालं आहे की, त्याची मोजणीही पूर्ण होऊ शकलेली नाही. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार मागच्या एक वर्षामध्ये राम मंदिराच्या वेगवेगळ्या दान काऊंटरवर ७०० कोटी रुपयांहून अधिकचं दान प्राप्त झालं आहे.
राम मंदिर निर्मिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या २० दिवसांमध्ये भाविकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत की, त्याची मोजणी करणंही शक्य होत नाही आहे. महाकुंभमेळ्यात आलेले लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. तसेच अनेक भाविक फंडपेटी पर्यंत पोहोचता येत नसल्याने मंदिर परिसरामध्येच आपल्या दानाची रक्कम ठेवत आहेत.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हापासून अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती सुरू झाली आहे. तेव्हापासून भक्तांकडून सातत्याने दान मिळत आहे. लोक आपल्याकडून यथाशक्ती दान देत आहेत. मागच्या वर्षभरात राम मंदिरामध्ये ७०० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे.