ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवून तरुणांची माथी कशा प्रकारे भडकावली जातात, काश्मीरमधील दगडखोरांना पाक कसा पैसा पुरवतो, याचे फुटीरतावादी नेत्याने केलेले धक्कादायक खुलासे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आले आहेत. एका व्हिडीओमध्ये फुटीरतावादी संघटना असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता कशा प्रकारे पाकिस्तान हवालामार्फत फंडिंग करतो हे स्वीकारत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. स्टिंगमध्ये दगडफेक, शाळेतील जाळपोळ आणि आमदारांवरील हल्ल्यांसंदर्भातही मोठे खुलासे करण्यात आले आहेत.
इंडिया टुडेच्या स्टिंगमध्ये एक फुटीरतावादी नेत्यानं पाकिस्तान हवालामार्फत कोटी रुपयांचा निधी देत असल्याचं कबूल केलं आहे. दुबई आणि सौदी अरेबियातून काश्मीरमध्ये कशा प्रकारे पैसा पाठवला जातो, याचीही माहितीही या स्टिंगमध्ये फुटीरतावादी नेत्यानं दिली आहे. फुटीरतावादी नेत्याशी इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं निधी देणा-या व्यक्तीच्या स्वरूपात बोलणी केली. रिपोर्टरशी बोलण्यासाठी दिल्लीत आलेल्या सय्यद शाह अळी गिलानीच्या हुर्रियत कॉन्फ्रेन्सचे नेते नईम खान यांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. रिपोर्टरनं काश्मीरमध्ये सरळ पैसा आणला जात असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यानं निधीचं सर्व काम दिल्लीतून होत असतं. तसेच भारत-पाक सीमेच्या रस्त्याद्वारे छोट्या स्वरूपातही निधी प्राप्त होतो. मात्र सर्व मोठा निधी हा दिल्लीतूनच येत असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. रिपोर्टरनं फंडिंग हवालामार्फत होत असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, सर्व काम दिल्लीतील बल्लीमारन आणि चांदनी चौकातून होते. अशा प्रकार भारतात हवाल्याचा काम होतं आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना कॅशलेस फंडिंग देत असल्याचंही स्टिंगमधूनच समोर आलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक ट्रक मुजफ्फराबादच्या श्रीनगरमध्ये येत-जात असतात. या ट्रकमधूनच पैसा पाठवला जात असल्याचंही नईम खान यांनी सांगितलं आहे. फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थनाशिवाय काश्मीरमध्ये शाळेत तोडफोड, जाळपोळ होत नसल्याचेही धक्कादायक खुलासे केले आहेत.