नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी किटो सँडल घालून जाणे, विशाखापट्टणममणील एका व्यावसायिकास भलतेच खटकले. त्यामुळे शूज खरेदी करण्यासाठी त्याने केजरीवालांना चक्क ३६४ रुपयांचा डिमांड ड्राफ्टच पाठविला आहे. त्यासोबत त्याने केजरीवालांना खुले पत्र लिहून, उपदेशाचे डोसही पाजले आहेत.ही रक्कम पाठविणाऱ्याचे नाव सुमित अग्रवाल आहे. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात झालेल्या स्नेहभोजन समारंभाला केजरीवाल किटो सँडल घालून गेले होते.सँडल घातलेले केजरीवाल ओलांद यांना भेटत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. हे न रुचल्यामुळेच अग्रवाल यांनी केजरीवालांना ३६४ रुपयांचा डीडी पाठवून त्यांना त्यातून शूज खरेदी करण्याची विनंती केली आहे. प्रत्येक कार्यक्रमाचे एक वेगळे महत्त्व असते. अशावेळी काही शिष्टाचार पाळणे आवश्यक ठरते. दिखावा वाईट; पण साधेपणाचा अतिरेक करणेही अशावेळी वाईटच दिसते. मुख्यमंत्री केजरीवालांनी हे ध्यानात घ्यावे, असे त्याने पत्रात नमूद केले आहे.
केजरीवाल यांना दिले जोडे खरेदीसाठी पैसे
By admin | Published: February 05, 2016 3:08 AM