PM Modi on ED: गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ईडी कारवाईमुळे अनेकांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. तर काही कारवायांमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड देखील जप्त केली आहे. ईडीचा वापर आम्हाला संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईडी ही स्वतंत्ररित्या काम करत असल्याचे म्हटलं आहे. मात्र आता ईडीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पैशांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडीच्या कारवायांबद्दल उघडपणे बोलले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने जप्त केलेला पैसा गरिबांना परत करण्यासाठी सरकार पर्याय शोधत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोदींनी सांगितले की, आपण ईडीने जप्त केलेली रक्कम गरिबांमध्ये वितरित करण्याचे मार्ग शोधत आहे.मात्र, हे कधी शक्य होईल हे मोदींनी सांगितलेले नाही. काँग्रेसच्या काळात ईडीने काम करणे बंद केले होते. तर भाजप सरकारमध्ये ईडी उघडपणे काम करत आहे, असेही मोदी म्हणाले.
"मी यावर खूप विचार करत आहे, कारण मला मनापासून वाटते की या लोकांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन गरीब लोकांचे पैसे लुटले आहेत आणि त्यांना ते परत मिळाले पाहिजेत. यासाठी मला कायदेशीर बदल करावे लागले तर मी करेन. सध्या मी यासाठी कायदेशीर बाजू समजून घेत आहे. मला सल्ला देण्याच्या सूचनाही मी न्यायव्यवस्थेला केल्या आहेत," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या जागी आणलेल्या न्याय संहितेमध्ये या संदर्भात काही तरतुदी असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. आतापर्यंत सरकारी यंत्रणांनी १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित प्रकरणांचा खास करुन उल्लेख केला.
"कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलेल्या सहकारी बँकांमध्ये वैयक्तिक व्यवसाय भागीदारीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याशिवायसुद्धा हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लालूजी रेल्वेमंत्री असताना त्यांनी गरीब लोकांना नोकऱ्या देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावावर जमीन घेतली. या जमिनी लोकांना परत करण्याच्या कराराचा विचार करत आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.