ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदी निर्णयानंतर देशभरातील नागरिकांना मोदी सरकारकडून 'विशेष गिफ्ट' मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडे 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम'चा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत गरीब तसेच श्रीमंत प्रत्येक नागरिकाला सरकारकडून दरमहिन्याला निश्चित रक्कम मिळणार आहे. ही विशेष योजना लागू झाल्यानंतरच ही रक्कम थेट प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सर्वांसाठी ही योजना लागू करणे अशक्य असल्यास सरकार गरजू नागरिकांसाठी या योजना प्रारंभ करण्यात येईल, अशीदेखील माहिती आहे.
गरजू व्यक्तींच्या खात्यात 500 रुपये जमा करुन या योजनेची सुरुवात केली जाऊ शकते. या योजनेमुळे देशभरातील जवळपास 20 कोटी गरजूंना याचा फायदा होईल, असे माहिती मिळाली आहे. हा प्रस्ताव लंडन युनिर्व्हर्सिटीचे प्राध्यापक गाय स्टँडिंग यांनी तयार केला. केंद्र सरकारमधील एका जबाबदार अधिका-याने ही योजना येत्या अर्थसंकल्पात जाहीर केली जाऊ शकते, असे सांगितल्याचा दावा गाय स्टँडिंग यांनी केला आहे. तसेच ही योजना टप्प्या-टप्प्यात लागू होणार असल्याचे संकेतही स्टँडिंग यांनी दिले आहेत.
स्टँडिंग यांनी असेही सांगितले की, सरकारने मध्य प्रदेशातील एका पंचायतीत पायलट प्रोजेक्ट म्हणून अशा प्रकारच्या योजनेवर काम केले होते, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले होते. मी माझ्या प्रस्तावात, श्रीमंत आणि गरीब सर्वांसाठीच एका निश्चित उत्पन्नाबाबतची गोष्ट मांडली आहे. प्राध्यापक गाय जगभरात युनिव्हर्सल बेसिक इनकमवर काम करत आहेत. दरम्यान, या योजनेबाबत सरकारी सूत्रांकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.