आग्रा – संपूर्ण जगात कोरोनाच्या जागतिक महामारीनं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या संकेताने उत्तर प्रदेश सरकारही तयारीला लागलं आहे. परंतु ताजमहल असलेल्या प्रसिद्ध आग्रा शहरात एक साधू कोरोनापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करत अन्न-पाणी त्याग करून तपस्येला बसले आहेत. मागील १ आठवड्यापासून साधू रखरखत्या उन्हात तपस्या करत असल्याचं सांगितलं जात आहे.
२० जूनपर्यंत साधूची तपस्या संपेल. ही घटना जगनेरच्या सरेंधी गावातील आहे. याठिकाणी महादेव मंदिराजवळ एक साधू श्री श्री १००८ गीता गिरी बाबा कोरोना महामारीची तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकांच्या सुरक्षेसाठी अन्न-पाणी त्याग करून तपस्येत लीन झालेले आहेत. मागील ७ दिवसांपासून ते कडक उन्हात मध्यभागी स्वत:च्या चारही बाजूला शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यात बसले आहेत. आणखी १४ दिवस ते अन्नपाण्याचा त्याग करणार आहेत.
साधूच्या कठोर तपस्येची जिल्हाभर चर्चा
जगनेर शहर आणि आसपासच्या गावांमध्ये या साधूच्या कठोर तपस्येची चर्चा सुरू आहे. लोक या साधूची कठीण तपस्या बघण्यासाठी मोठ्या संख्येने महादेव मंदिर परिसरात येत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे श्री श्री १००८ गीता गिरी बाबा मागील ७ दिवसांपासून तपस्या करत आहेत. बाबाने यापूर्वीही विविध ठिकाणी अशाप्रकारे तपस्या केली आहे. यावेळी गिरी बाबाची तपस्या २० जून रोजी गंगेच्या दशहराच्या दिवशी पूर्ण होणार असल्याचं ते म्हणाले.
अनेक साधूंनी तपस्या केली अद्यापही अनेकांची सुरू
आग्रा येथे अनेक साधूंनी कोरोना काळात तपस्या केली आहे. मागील वर्षी इटौरा भागात एक साधू हिवाळाच्या ऋतुमध्ये रात्रभर थंडीत २५१ कलशांनी स्नान केले तर उन्हाळ्याच्या दिवशी आगीच्या मध्यभागी तपस्या करत होते. अलीकडेच शमशाबाद येथे एक साधू ५१ दिवस तपस्येला बसले होते. पिनाहटमध्येही साधू तपस्येला बसले आहेत. त्याचसोबत अनेक भाविक निरंतर पूजेचे पठण करून कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मी धूप घालून हवन करत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळेस करते. या दोन्ही वेळेस धूपयुक्त हवन केल्याने गृहक्लेशही होत नाही. यामध्ये तूप, नीमची पाने आणि लोबान यांचा समावेश करावा. धूपयुक्त हवनमुळे घरातील वातावरण शुद्ध होते. लोबान आणि अन्य सामग्रीमुळे आजार रोखण्यास मदत होते. मी रोज हवन करते, तुम्हीही करा, असं प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अजब विधान केले आहे.