आग्रा : वृंदावनातील बांके बिहारी मंदिर परिसरात शनिवारी पाऊस बरसला आणि आकाशातून पावसाच्या थेंबांऐवजी चक्क ५००-५०० रुपयांच्या नोटा बरसू लागल्या. नोटांचा पाऊस पडत असल्याचे पाहून नोटा गोळा करण्यासाठी सगळ्यांनी एकच गर्दी केली; पण थोड्याच वेळात ही एका माकडाची करामत असल्याचे लक्षात आले. एका महिलेची पर्स पळवून तिच्यातील दीड लाखाची रोख रक्कम या माकडाने अक्षरश: उधळून लावली.मुंबईच्या बोरीवली भागात राहणाऱ्या हेमवती सोनकर (५०) आपल्या दोन मुली व पतीसोबत आग्रा, मथुरा, वृंदावन येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. शनिवारी सोनकर कुटुंब वृंदावनच्या बोळीतील बाजारात खरेदीसाठी निघाले. याच वेळी एक माकड आले आणि हेमवती यांच्या हातातील पर्स घेऊन पळून गेले. खाण्यास काहीतरी दिल्यास माकड पर्स सोडून देईल, असे समजून हेमवतींनी त्याला खायलाही दिले. पण असे न करता माकडाने थेट मंदिराबाहेर धूम ठोकली. यानंतर अख्खे कुटुंब माकडाच्या मागे धावू लागले. यामुळे माकड आणखीच बिथरले आणि पर्स उघडून त्यातील एक एक वस्तू बाहेर फेकण्याचा सपाटा त्याने सुरू केला. काही क्षणातच पर्समधील ५००-५०० रुपयांच्या नोटा उधळणेही सुरू केले. नोटा उधळल्या जात असल्याचे पाहून लोकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड उडाली. यापैकी काहींनी अनेक नोटा वेचून सोनकर कुटुंबाच्या हातात दिल्या. मात्र काहींनी पैसे वेचून तेथून धूम ठोकणे पसंत केले. हेमवती यांच्या मुलीनेही नोटा गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच धांदलीत तिच्या मागच्या खिशातील ३० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन कुणीतरी पसार झाले. (वृत्तसंस्था)
माकडाने उधळल्या ५०० च्या नोटा
By admin | Published: July 21, 2015 12:16 AM