Monkey Pox Prevention Guidelines: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 'मंकीपॉक्स'च्या व्यवस्थापनावर राज्य/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. क्लिनिकल नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम नेटवर्कद्वारे NIV पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जातील. आत्तापर्यंत भारतात मंकी पॉक्सचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटच्या संपर्कात आल्यापासून २१ दिवसांच्या कालावधीसाठी किमान दररोज लक्ष ठेवलं पाहिजे असं नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, मंकीपॉक्स महामारीचं रुप घेणार नाही असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे. अद्याप या विषाणूबद्दल नेमकी स्पष्टता आलेली नाही. मंकीपॉक्सचे रुग्ण मे महिन्याच्या सुरुवातीपासून जगभरात आढळू लागले आहेत. जगभरातील २४ देशात मंकीपॉक्सचे ४३५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्याचा डेटानुसार, कोविड 19 आणि आरएनए व्हायरससारख्या इतर विषाणूंप्रमाणे ते सहजपणे प्रसारित होत नाही. मंकीपॉक्सबाबत डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस यांनी सांगितले की, या क्षणी आम्हाला जागतिक महामारीची चिंता नाही. मात्र, वाढती प्रकरणे त्यांच्या चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. हा विषाणू प्रथम समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला. भारतात अद्याप एकही केस आढळलेला नाही परंतु सतर्कता वाढली आहे. मंकीपॉक्स व्हायरसबाबत मुंबई विमानतळ आणि मुंबई महापालिका सतर्क आहे.