मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट 'क्लेड 1 बी' भारतात पोहोचला आहे. हा एक अतिशय वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे, जो आजकाल काँगोसह अनेक देशांमध्ये कहर करत आहे. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सचा हा खतरनाक व्हेरिएंट रोखण्यासाठी बरीच तयारी केली होती, पण ज्याची भीती होती तेच घडलं... भारतात मंकीपॉक्सच्या 'क्लेड 1 बी' प्रकाराची पहिली केस नोंदवण्यात आली आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील एका ३८ वर्षीय पुरुषामध्ये क्लेड 1 बी स्ट्रेन आढळून आला आहे, जो नुकताच UAE मधून भारतात परतला आहे.
Mpox व्हायरसच्या क्लेड 1 बी व्हेरिएंटच्या प्रकरणाची पुष्टी करणारा भारत हा तिसरा देश बनला आहे. केरळमधीलआरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे. अनेक रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून या व्हायरसचा प्रसार रोखता येईल. केरळचा आरोग्य विभाग मंकीपॉक्स प्रतिबंध आणि उपचारांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची योजना आखत आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागही अधिक सतर्क झाला आहे. हा व्हेरिएंट अतिशय धोकादायक आहे, मात्र त्याबाबत बरीच माहिती उपलब्ध आहे. मंकीपॉक्सचा नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर केरळच्या आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, रुग्णांची संख्या वाढल्यास आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन सुविधा उभारण्यात आल्या आहेत आणि विमानतळांसह पाळत ठेवणं अधिक मजबूत करण्यात आले आहे असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सध्या पाच प्रयोगशाळांमध्ये टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास टेस्टसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात येईल. मंत्र्यांनी केरळमधील रुग्णामध्ये एमपॉक्स स्ट्रेनची पहिली पुष्टी झाल्याचा उल्लेख केला नसला तरी, त्यांनी जाहीर केलं की राज्यातील एमपॉक्सच्या प्रतिबंधासाठी आणि प्रभावी उपचारांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील.
दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, भारतातील MPox स्ट्रेनची पहिली केस केरळमधील एका रुग्णामध्ये आढळून आली होती, ज्याची टेस्ट गेल्या आठवड्यात झाली होती. क्लेड 1 B स्ट्रेन मलप्पुरम जिल्ह्यातील एका ३८ वर्षीय व्यक्तीमध्ये आढळला होता, जो नुकताच संयुक्त अरब अमिरातीहून परतला होता. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.