केरळच्या एका २२ वर्षीय तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचा संशय होता. यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
केरळच्या गुरुवायूरजवळील कुरनजीयूरमधील हा तरुण होता. तो संयुक्त अरब अमिरातहून भारतात आला होता. त्याचे नमुने नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठविण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या तरुणाला मंकीपॉक्स सारखे कोणतेही बाहेरील लक्षण नव्हते. मात्र, संशय आल्याने त्याला २७ जुलै रोजी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दुसरीकडे देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. दिल्लीतील रुग्णाच्या स्थितीतही सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. केरळमधील 22 वर्षीय तरुणाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना त्याला ताप आला आणि तो कोसळल्याची माहिती दिली. सुरुवातीला त्याला मेंदुज्वर झाल्याचा डॉक्टरांना संशय होता. क्षयरोग झाल्याची देखील शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
नातेवाइकांनी सांगितले की, तो यूएईमधील मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यांनी यूएईमधून त्याच्या मित्रांनी पाठवलेल्या एकाच्या चाचणीच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉटही दाखवला होता. स्क्रीनशॉटमध्ये रुग्णाचे नाव आणि तपशील नव्हता. यामुळे डॉक्टरांनी भारतातही त्याच्या चाचण्या घेण्याचा सल्ला दिला होता.