नवी दिल्ली-
कोरोनानंतर सध्या मंकीपॉक्सच्या संकटानं जगाची चिंता वाढवली आहे. सध्या जगातील ७५ पेक्षा अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. याअंतर्गत जगभरात आतापर्यंत एकूण २० हजाराहून अधिक मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंकीपॉक्स जगभरातील देशांमध्ये हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण आढलेल्या रुग्णांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. अशातच मंकीपॉक्सच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार देखील अलर्ट मोडवर आहे. देशासह संपूर्ण जगासाठी संजीवनी ठरण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला असून मंकीपॉक्सवर स्वदेशी लस निर्मितीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
स्वदेशी लस आणि टेस्टिंग कीट बनवण्यासाठी भारत सरकारनं काढलेल्या निविदेसाठी ८ कंपन्यांनी लस निर्मितीत, तर २३ फार्मा कंपन्यांनी टेस्टिंग किट निर्मितीत स्वारस्य दाखवलं आहे. कोरोना संकटातून जगाला मदत करण्यात भारतानं महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. भारतात विकसीत करण्यात आलेल्या लसीचा मोठ्या प्रमाणात जगभरात पुरवठा करण्यात आला होता. अनेक देशांना भारतानं कोरोना लसीचा पुरवठा केला होता. आता मंकीपॉक्स विरुद्धच्या लढ्याचंही नेतृत्व करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे.
पीपीपी मोडवर तयार होणार स्वदेशी लस आणि टेस्टिंग कीटमंकीपॉक्सवर स्वदेशी कोरोना लस आणि टेस्टिंग किट बनवण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च भारताचं नेतृत्व करत आहे. याअंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीवर स्वदेशी लस आणि टेस्टिंग किट निर्मिती केली जाणार आहे. या संदर्भात आयसीएमआरनं विविध कंपन्यांकडे निविदा सादर करण्याचं आवाहन केलं होतं. या संदर्भात आयसीएमआरला आतापर्यंत एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
ICMR च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PPP मोडमध्ये मंकीपॉक्स विषाणूसाठी स्वदेशी लस आणि टेस्टिंग किट विकसित करणाऱ्या विविध उत्पादकांकडून आतापर्यंत ३१ निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ८ कंपन्यांनी लस तयार करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे, तर २३ कंपन्यांनी डायग्नोस्टिक किट विकसित करण्यासाठी अर्ज केले आहेत.
'सीरम'नं डेन्मार्कमधील कंपनीकडून मागवली लसमंकीपॉक्सची लस आधीच बाजारात उपलब्ध आहे. डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकने लस बनवली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून डेन्मार्कमधून या लसीची काही खेप आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. "एकदा करार पूर्ण झाल्यानंतर देशात लस आयात करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील. देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सची केवळ काही प्रकरणं नोंदवली गेली आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर लसीची मागणी आणि विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी SII ला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल", असं आदर पुनावाला यांनी सांगितलं.